कागलमध्ये मटका अड्ड्यावर छापा, दोघांना अटक; १७०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त!

कागल (सलीम शेख). : कागल पोलिसांनी आज कसबा सांगाव येथील एका मटका अड्ड्यावर छापा टाकून दोघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १७०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, मुख्य बुकी मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे.
पोलिसांना कसबा सांगाव येथील शिला कानडे यांच्या माळभागातील भाड्याच्या खोलीत मटका सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कागल पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. त्यावेळी मटका एजंट सिकंदर भीमराव कांबळे (वय ७०, रा. मेन रोड, राजीव गांधी नगर, माळभाग, कसबा सांगाव, ता. कागल) आणि मटका खेळणारा देवस्कर मीरा कांबळे (वय ६५, रा. बेघर वसाहत, सांगाव, ता. कागल) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी १५०० रुपयांच्या विविध नोटा (५००, १००, ५०, १० रुपयांच्या), मुंबई लिहिलेल्या दोन स्लिप बुक, बॉल पेन आणि रोख २०० रुपये असा एकूण १७०५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या प्रकरणातील मुख्य बुकी सतीश भिंगारडे (रा. कसबा सांगाव) हा मात्र पोलिसांच्या हाती लागलेला नाही, तो सध्या फरार आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भाट करत आहेत.