महाराष्ट्र ग्रामीण

गोकुळ शिरगाव पोलिसांची अवैध दारूविक्रीविरोधात धडक मोहीम; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : सध्या शहर आणि जिल्ह्यामध्ये दारूबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी गोकुळ शिरगाव पोलिसांनी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. अवैध दारूची विक्री आणि निर्मिती करणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून, गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
पंचतारांकित एमआयडीसी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी आणि गोकुळ शिरगाव यांसारख्या विविध ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले आहेत. या कारवाईदरम्यान, दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन असलेली बॅरल्स जेसीबीच्या साहाय्याने नष्ट करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेअंतर्गत शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांत गुप्त माहितीच्या आधारे कारवाई सुरू आहे. विशेषतः माळभागात, आढोशाला, हातगाड्यांवर आणि घरांमध्ये लपून छपून चालणाऱ्या अवैध दारू विक्रीच्या ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर आहे. गेल्या चार दिवसांत गोकुळ शिरगाव पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत लाखो रुपयांची अवैध दारू आणि दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. या मोहिमेअंतर्गत, गोकुळ शिरगावमधील सिद्धार्थनगर येथील प्रदीप जयसिंग बागडे (वय ३९) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी.जे. मगदूम यांनी सांगितले की, समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, तसेच तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी दारूबंदीची अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, या मोहिमेत कोणतीही हयगय केली जाणार नाही आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना कायद्यानुसार शिक्षा केली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button