राजर्षी शाहू महाराजांना १५१ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

कसबा बावडा (सलीम शेख ) : लोककल्याणकारी राजा, थोर समाजसुधारक आणि समतेचे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या कसबा बावडा येथील जन्मस्थळी त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर, शासकीय अधिकारी, नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहू महाराजांचे कार्य हे नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. त्यांनी समाजातील वंचित आणि दुर्बळ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले. शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी खुले करून, आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवून आणि जातीभेद निर्मूलनासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलून त्यांनी समाजात क्रांती घडवून आणली. त्यांचे दूरदृष्टीचे विचार आणि कार्य आजही आपल्या समाजाला योग्य दिशा देत आहे.
या अभिवादन सोहळ्याप्रसंगी, महाराजांच्या दूरदृष्टीला आणि कार्याला नमन करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प सर्वांनी केला.
यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जेष्ठ इतिहास तज्ञ जयसिंगराव पवार, इंद्रजीत सावंत, वसंतराव मुळीक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.