कोल्हापूर चित्रनगरीला ४४ कोटींच्या विकासकामांनी नवी दिशा: सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : कोल्हापूर चित्रनगरीच्या विकासाला नवी गती देत, ४४ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच राज्याचे सांस्कृतिक मंत्री मा. ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर साहेब उपस्थित होते. खासदार धनंजय महाडिक यांनी या विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक आणि निधी मंजूर करणारे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानले.
खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “या विकास कामांमुळे कोल्हापूर चित्रनगरीला अधिक बळकटी मिळेल आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासाला अधिक गती मिळेल अशी आशा आहे.” महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला जपणाऱ्या आणि कोल्हापूरच्या विकासाला चालना देणारा हा आजचा ऐतिहासिक दिवस असल्याचेही त्यांनी नमूद केले. यामुळे चित्रनगरी भविष्यात आणखी मोठ्या उंचीवर जाईल आणि कलाकार तसेच तंत्रज्ञानासाठी नवनवीन संधी उपलब्ध होतील अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
या सोहळ्याला भाजपा आमदार अमल महाडिक, भाजपा आमदार राहुल आवाडे, महेश जाधव, विजय जाधव यांच्यासह अनेक कलाकार, रसिकप्रेक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा विकास कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासाला हातभार लावेल अशी अपेक्षा आहे.