तीन वाहनांच्या विचित्र अपघातात ओमनी कारचे मोठे नुकसान!

कणेरीवाडी (सलीम शेख ) : कोल्हापूर-कागल राष्ट्रीय महामार्गावरील कणेरीवाडी फाट्याजवळ दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एक ओमनी चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने, या अपघातात जीवितहानी झाली नाही, मात्र ओमनी चालक किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कागलहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या दोन कर्नाटक बसेसच्या मधोमध एक ओमनी चारचाकी सापडली. या अपघातात ओमनी गाडीच्या दर्शनी व मागील भागाचे मोठे नुकसान झाले. ओमनी चालक, समशेर शब्बीरअली शेख (वय ४१, रा. हनुमान नगर, कागल) यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक नागरिक, पोलीस यांच्या मदतीने वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
महामार्गावरील अपघातांची मालिका चिंतेचा विषय
विशेष म्हणजे, याच मार्गावर दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारचा तीन वाहनांचा अपघात झाला होता. राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दर दोन-तीन दिवसांनी अपघात घडत असल्याने परिसरात नाराजीचे वातावरण आहे. महामार्गाच्या कामामुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या अपघाताची नोंद उशिरापर्यंत गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली नव्हती. महामार्ग प्राधिकरणाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करावे, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.