वृद्धांना लुटणाऱ्या दोघांना एलसीबीकडून अटक; २.४० लाखांचा मुद्देमाल जप्त!

कोल्हापूर (सलीम शेख ) : जिल्ह्यातील निर्जनस्थळी वृद्धांना धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिसांनी अटक केली आहे. देवेंद्र पताडे आणि बाळू नाईक अशी त्यांची नावे असून, त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, दोन मोबाईल संच आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण २ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिल्या होत्या. त्यानुसार, चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यात निर्जनस्थळी वृद्धांना लुटणारे हे दोघे गडहिंग्लज तालुक्यातील नलवडे सहकारी साखर कारखान्याजवळ येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, समीर कांबळे, सतीश जंगम, अरविंद पाटील, अमित सर्जे, सतीश सूर्यवंशी आणि राजेंद्र वरंडेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.