एकतेचा आदर्श: मुस्लिम नसतानाही मजले गावात हिंदू बांधव शतकानुशतके साजरा करतात मोहरम!

हातकणंगले (सलीम शेख ) : सामान्यतः मुस्लिम धर्मीयांचा सण म्हणून ओळखला जाणारा मोहरम, हातकणंगले तालुक्यातील मजले गावात मात्र एका वेगळ्याच रूपात साजरा होतो. या गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही, मशीद नाही की दर्गा नाही, तरीही येथील हिंदू बांधव गेल्या शेकडो वर्षांपासून मोठ्या उत्साहात मोहरम साजरा करत आहेत. हातकणंगले परिसरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा उत्तम प्रत्यय देणारा हा उत्सव, विशेषतः मजले गावातील धार्मिक सलोख्याचा अनोखा संदेश देतो. ‘न्यूज कट्टा’चे हे विशेष वृत्त…
मोहरम हा इस्लामिक दिनदर्शिकेतील पहिला महिना असून, शिया मुस्लिम बांधवांसाठी हा शोकाचा काळ असतो. या महिन्यात ते कर्बलाच्या लढाईत शहीद झालेल्या इमाम हुसेन आणि त्यांच्या साथीदारांच्या बलिदानाचे स्मरण करतात. इमाम हुसेन यांनी न्याय आणि सत्यासाठी संघर्ष केला, आणि मोहरम आपल्याला त्या संघर्षाची आठवण करून देतो. कोल्हापूर जिल्ह्यातही हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रित येत हा उत्सव साजरा करतात.
मजले हे तसे शेतीप्रधान गाव. शेतात राबणारे, कष्ट करणारे येथील लोक गुण्यागोविंदाने नांदतात. काही वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी ‘पाणीदार गाव’ बनवण्याचा चंग बांधला आणि तो यशस्वी करून दाखवला, तेव्हा मजले गाव खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले. पण, शेकडो वर्षांची परंपरा असलेला मोहरम उत्सव साजरा करून त्यांनी समाजासमोर एक वेगळाच आदर्श ठेवला आहे.
एकिकडे सामाजिक वातावरण गढूळ होत असताना, मजले गावात एकही मुस्लिम नसतानाही पिरांची स्थापना हनुमान मंदिरात केली जाते. गावातील हिंदू बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग, त्यांच्याकडून होणारे मोहरमचे विधी आणि उपवास करून मजलेवासी इमाम हुसेन यांच्या बलिदानाचा गौरव करताना दिसतात. मोहरमचे दहा दिवस येथील लोक भक्तीभावाने पाळतात. पाचव्या दिवशी पिरांची स्थापना केली जाते. सातव्या दिवशी भेटीसाठी बाहेर पडतात. नवव्या दिवशी येथील हनुमान मंदिरासमोर हिंदू समाजातील लोकांकडून खाई पूजनाचा विधीवत कार्यक्रम झाल्यानंतर खाईला अग्नी दिला जातो. त्याच दिवशी गावामध्ये गोड नैवेद्य बनवून तो पिरांना अर्पण केला जातो. मजले गावाबरोबरच पंचक्रोशीतील लोकही येथे दर्शनासाठी गर्दी करतात.
त्यानंतर पहाटे खाई फोडण्याचा कार्यक्रम होतो आणि पारंपरिक बुरूज खेळाचे सादरीकरण केले जाते. यामध्ये धगधगत्या विस्तवावरून हिंदू बांधव इमाम हुसेन यांचा नामोच्चार करत खाई पार करतात. तर, दहाव्या दिवशी दफन विधी होऊन पिरांचे विसर्जन केले जाते. हे सर्व विधी मुस्लिम पद्धतीने गावातीलच हिंदू बांधव करतात.
हिंदू-मुस्लिम ऐक्याची ही शेकडो वर्षांची परंपरा जपून मजले गावाने समाजासमोर एक अध्यात्मिक आणि सामाजिक एकोप्याचा आदर्श जपला आहे.