गोकुळ शिरगावमध्ये दोन दिवस पाणी कपात मुख्य जलवाहिनी दुरुस्तीमुळे निर्णय; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : ऐन पावसाळ्यात गोकुळ शिरगाव येथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. गावातील मुख्य जलवाहिनीला (मेन लाईन) गळती लागल्याने पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण झाला असून, या दुरुस्तीच्या कामासाठी पुढील दोन दिवस गावाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून गावातील मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत होता. यामुळे ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळत नव्हते. यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी गोकुळ शिरगाव ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी पाणीपुरवठा दोन दिवस बंद ठेवणे आवश्यक असल्याने नागरिकांनी याची नोंद घ्यावी. ग्रामपंचायतीने नागरिकांना या कालावधीत पाण्याचा जपून वापर करण्याचे आणि आवश्यकतेनुसार पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. यामुळे नागरिकांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो, मात्र दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.