कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली; इशारा पातळी गाठण्याची शक्यता!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. आज (शुक्रवार, ४ जुलै २०२५) दुपारी १२ वाजता राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पाणी पातळी ३३ फुटांवर पोहोचली आहे. यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात सर्वत्र पावसाची उघडझाप सुरू असली तरी, धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, ज्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट असून धोका पातळी ४२ फूट आहे. सद्यस्थिती पाहता, दिवसभर पाऊस असाच सुरू राहिल्यास आज संध्याकाळपर्यंत पंचगंगा नदी इशारा पातळी गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सततच्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ५३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये पंचगंगा नदीवरील सर्व बंधाऱ्यांचा समावेश आहे. शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि शिरोळ येथील बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.
जिल्हा प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, नदीकाठच्या नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.