शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध: पर्यायी मार्गांची मागणी!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्ह्यातून प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. शेतकरी संघटनेने एक व्हिडिओ जारी करत या महामार्गाला पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याने तो रद्द करण्याची मागणी केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
शेतकरी संघटनेने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, शक्तिपीठ महामार्गाला पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. यापैकी मार्ग प्रस्तावित महामार्गापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर आहे, काही ठिकाणी तीस किलोमीटर अंतरावर आहे. हे दोन्ही मार्ग अस्तित्वात असताना शेतकऱ्यांची सुपीक जमीन संपादित करून नवीन महामार्ग बांधण्याची गरज नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
या व्हिडिओमध्ये शेतकरी संघटनेने शक्तिपीठ महामार्ग रद्द का करण्यात यावा, याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, या महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर शेतजमीन आणि बागा उद्ध्वस्त होणार आहेत, ज्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे जीवनमान विस्कळीत होईल. तसेच, पर्यावरणावरही याचा विपरीत परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
शेतकरी संघटना सातत्याने या विरोधात आवाज उठवत असून, शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून शक्तिपीठ महामार्गाचा निर्णय रद्द करावा, अशी त्यांची मागणी आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या आंदोलनाला आणखी धार येण्याची शक्यता आहे.