अंबप फाट्यावर कंटेनर-गॅस सिलिंडरवाहक ट्रकचा अपघात; दोन्ही वाहने खड्ड्यात अडकली!

नवे पारगाव ( सलीम शेख ): पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील अंबप फाटा (ता. हातकणंगले) येथे रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका कंटेनरने रिकाम्या गॅस सिलिंडरवाहून नेणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहने महामार्ग आणि सेवा रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्ड्यात अडकली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत पेट्रोलियमचा एक ट्रक कोल्हापूर येथे गॅस सिलिंडर उतरवून रिकाम्या टाक्या घेऊन पुण्याच्या दिशेने जात होता. अंबप फाट्यापासून वठारच्या दिशेने हॉटेल मंथनजवळ पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या चौदा चाकी कंटेनरच्या चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरने धडक दिली.
या धडकेमुळे दोन्ही वाहने महामार्गावरून बाजूला होऊन सेवा रस्त्यालगतच्या खड्ड्यात जाऊन अडकली. अपघाताच्या वेळी या ठिकाणी दुसरे कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. ट्रक रिकाम्या गॅस टाक्या घेऊन जात असल्यानेही संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात येत आहे.