अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला महाराष्ट्राचा तीव्र विरोध: लोकप्रतिनिधींच्या बैठकीत भूमिकेवर शिक्कामोर्तब!

मुंबई (सलीम शेख ) : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी महापुराचे प्रमुख कारण बनलेल्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास महाराष्ट्र शासनाने तीव्र विरोध दर्शवला आहे. या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सहभागी लोकप्रतिनिधींनी अलमट्टीच्या उंची वाढवण्याला विरोध करण्याची आपली ठाम भूमिका मांडली.
या बैठकीला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, धैर्यशील माने, विशाल पाटील यांच्यासह आमदार सर्वश्री डॉ. विनय कोरे, राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, राहुल आवाडे, सुरेश खाडे, विश्वजीत कदम, सदाभाऊ खोत, अरुणअण्णा लाड, इद्रिस नायकवडी आदी प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. तसेच, जलसंपदा विभागाचे अधिकारीही या बैठकीत उपस्थित होते.
या बैठकीत, अलमट्टी धरणाच्या उंची वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसला असून, त्याचे एक प्रमुख कारण अलमट्टी धरण असल्याचे मानले जाते. त्यामुळे, भविष्यातील संभाव्य पूरसंकट टाळण्यासाठी आणि नागरिकांचे जीवन व मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी अलमट्टीची उंची वाढवण्यास विरोध करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले.
या भूमिकेमुळे, महाराष्ट्र शासनाची अलमट्टी धरणासंदर्भात कायदेशीर आणि तांत्रिक पातळीवर लढा देण्याची तयारी दिसून येत आहे.