वैद्यकीय शिक्षण सुविधा ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी शासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक!

कोल्हापूर (सलीम शेख ) : महाराष्ट्रात शासकीय वैद्यकीय शिक्षणाच्या सुविधा अधिक सक्षम करून त्या ग्रामीण आणि दुर्गम भागांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने ठोस पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन, मुंबई येथे आरोग्य विभागाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अमरावती, धाराशिव आणि नाशिक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित या बैठकीत राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता (Dean) आणि संबंधित अधिकारी सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी गडचिरोली येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. तसेच, या प्रकल्पासाठी वाढीव बांधकाम खर्चास प्रशासकीय मान्यता घेण्याचेही आदेश देण्यात आले.
या बैठकीचा मुख्य उद्देश वैद्यकीय शिक्षण सुविधा खऱ्या अर्थाने ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेपर्यंत पोहोचाव्यात हा होता. या दृष्टीकोनातून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश कुमार मीना, आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव वीरेंद्र सिंह, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. विजय कंदेवाड आणि आरोग्य विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.