मुख्यमंत्र्यांचा बाल आशीर्वाद’ निघाला खोटा: इचलकरंजीत बनावट योजनेमुळे पालकांची तारांबळ

कोल्हापूर (सलीम शेख ) : बनावट योजनाचे इचलकरंजी येथील एका हायस्कूलने राज्य शासनाच्या अस्तित्वातच नसलेल्या ‘बाल संगोपन योजने’ची माहिती अधिकृत सही-शिक्क्यासह प्रसारित केल्याने पालकवर्गात मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या योजनेत दरमहा चार हजार रुपये मदत मिळणार असल्याचे भासवण्यात आले होते. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे तक्रार गेल्यानंतर या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
या प्रकाराची मूळ मध्य प्रदेश सरकारच्या ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ या नावात दडलेली आहे. मध्य प्रदेशमध्ये दोन्ही किंवा एक पालक नसलेल्या मुलांना आर्थिक मदत देण्याची योजना अस्तित्वात आहे आणि त्याअंतर्गत तेथील सरकार दरमहा काही ठराविक रक्कम देते. याच योजनेची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
ही व्हायरल झालेली माहिती पाहून इचलकरंजीतील एका हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी घाईघाईने पालकांसाठी या योजनेचा लाभ घेण्याबाबत एक पत्र तयार केले. या पत्रावर शाळेचा सही-शिक्का मारून ते फलकावर लावले. एका पालकाने या पत्राचा फोटो काढून व्हॉट्सअॅपवर शेअर केला आणि शाळेचा शिक्का व मुख्याध्यापकांची सही असल्याने अनेक लोकांना ती माहिती खरी वाटली.
मात्र, ह्या पत्राची हरकत घेऊन सत्यता पडताळून पाहिली असता. त्यावेळी महाराष्ट्रात अशी कोणतीही योजना अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले. या बनावट माहितीला बळी न पडण्याचे आवाहन पालकांना केले आहे. या घटनेमुळे माहितीची खातरजमा न करता प्रसारित केल्यास किती मोठा गैरसमज होऊ शकतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.