रांगोळीतील ग्रामपंचायत सदस्य अपहरण आणि खूनप्रकरणी सराईत टोळी जेरबंद

रांगोळी : हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथील ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे यांच्या अपहरण आणि खून प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. या गंभीर गुन्ह्यातील सराईत आरोपींच्या एका टोळीला अटक करण्यात आली असून, यात चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशावरून आणि मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींनी लखन बेनाडे यांचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली आहे.
३६ वर्षीय लखन बेनाडे हे रांगोळी येथे राहत होते आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता असल्याची नोंद (मिसिंग) करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या प्रकरणाचा उलगडा झाला. तपासात असे निष्पन्न झाले की, लखन बेनाडे यांनी राजेंद्रनगर येथील विशाल घस्ते आणि त्याची पत्नी लक्ष्मी घस्ते यांच्याविरोधात वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या होत्या. यामागे कौटुंबिक आणि व्यक्तिगत वाद असल्याचे समोर आले आहे.
१० जुलै २०२५ रोजी सायबर चौकात लक्ष्मी घस्ते हिने तिचा पती विशाल घस्ते याला बोलावून लखन बेनाडे यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. त्यानुसार विशाल घस्ते याने त्याचे तीन साथीदार – आकाश उर्फ माया घस्ते (वय २१), संस्कार सावर्डे (वय २०), आणि अजित चुडेकर (वय २९) यांना सोबत घेतले. त्यांनी सायबर चौकातून लखन बेनाडे यांचे अपहरण केले. त्यानंतर शाहू टोल नाक्याजवळून तवेरा गाडीतून त्याला सकेश्वर गावच्या नदीकिनारी नेऊन त्याचा निर्घृण खून करण्यात आला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विशाल घस्ते (पती), लक्ष्मी घस्ते (पत्नी), आकाश उर्फ माया घस्ते, संस्कार सावर्डे, आणि अजित चुडेकर यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींनी गुन्हा केल्याचे तपासात मान्य केले आहे. विशेष म्हणजे, या आरोपींविरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे दाखल असून, ते पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार आहेत.
पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक बी. धीरज कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गळवे आणि त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी या गुन्ह्याच्या तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.