पोलिसांची कोरोची येथे मोठी कारवाई: 6.73 लाखांचे मेफेड्रॉन (MD) जप्त, सतीश कुंभार यांच्या प्रयत्नांना यश!

हातकणंगले, कोल्हापूर (सलीम शेख ): कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे 6,73,200 रुपये किमतीचे मेफेड्रॉन (MD) ड्रग्ज जप्त केले. जिल्ह्यामध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी ड्रग्जविरोधी कारवाई मानली जात असून, पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.
शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांना गुप्त खबऱ्यांकडून कोरोचीमध्ये ड्रग्ज विक्रीसाठी आणले जाणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचला. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कोरोची गावाच्या हद्दीत, साईनाथ वजन काट्याजवळ, पंचगंगा साखर कारखाना ते कोरोची जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी कारवाई केली.
या कारवाईत ऋषभराजू खरात (वय 30, रा. लोकमान्य नगर, कोरोची, ता. हातकणंगले) याला मुद्देमालासह अटक करण्यात आली. त्याच्याकडून 6,70,200 रुपये किमतीचे 134.04 ग्रॅम मेफेड्रॉन (MD) अंमली पदार्थ, 2,500 रुपये रोख रक्कम आणि 500 रुपये किमतीचे इतर साहित्य असा एकूण 6,73,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. यामध्ये पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे, श्रीकृष्ण दरेकर, पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे, प्रमोद भांगरे, महेश कोरे, अर्जुन फातले, रोहित डावाळे, सतीश कुंभार, आयुब गडकरी, शशिकांत ढोणे, होमगार्ड महेश शेळके आणि इम्रान मुल्ला यांचा समावेश होता.
पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांनी यापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डीबी पथकात कार्यरत असताना अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत. त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील ही सर्वात मोठी कारवाई असल्याने पोलीस दलातून त्यांचे अभिनंदन होत आहे. या यशस्वी कारवाईमुळे ड्रग्जविरोधी लढ्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.