इंगळी स्मशानभूमीची दुरवस्था; नागरिकांना जीव मुठीत घेऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ!

इंगळी (सलीम शेख ) : इंगळी येथील स्मशानभूमीची अत्यंत दुरवस्था झाली असून, यामुळे नागरिकांना मृतांवर अंत्यसंस्कार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्मशानभूमीतील शेडचे लोखंडी अँगल पूर्णपणे गंजले असून ते अत्यंत कमकुवत झाले आहेत. यामुळे कोणत्याही क्षणी शेड कोसळून मोठी दुर्घटना होण्याची भीती नागरिकांना सतावत आहे.
सुमारे १० ते १२ हजार लोकसंख्या असलेल्या इंगळी गावात दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने मृत्यू होत असतात. अशावेळी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिक याच स्मशानभूमीत येतात. मात्र येथील अपुऱ्या सुविधांमुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
स्मशानभूमीतील प्रमुख समस्या शेडचे लोखंडी अँगल सडून कमकुवत झाले आहेत, ज्यामुळे ते कोसळण्याची भीती आहे.
स्मशानभूमीत लाईटची कोणतीही सोय नाही. मोठ्या प्रमाणात तणकाट वाढले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मृतदेह दहन करण्यासाठी वापरला जाणारा पाळणा तुटलेल्या अवस्थेत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. या परिस्थितीत नागरिकांना आपला जीव मुठीत धरून अंत्यसंस्कार करावे लागत आहेत, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.
या गंभीर स्थितीकडे इंगळी ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष घालून स्मशानभूमीची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) इंगळी शहर प्रमुख केशव नारायण पाटील यांनी ग्रामपंचायतीला इशारा दिला आहे. “जर इंगळी ग्रामपंचायतीने पुढील आठ दिवसांत यावर कोणताही निर्णय घेतला नाही आणि स्मशानभूमीची दुरुस्ती केली नाही, तर आम्ही सर्व गावकरी आणि शिवसैनिक शिवसेनेच्या स्टाईलने ग्रामपंचायतीसमोर बोंब मारून आंदोलन करू,” असे केशव नारायण पाटील यांनी सांगितले.
या परिस्थितीमुळे इंगळी ग्रामपंचायतीवर तातडीने उपाययोजना करण्याची जबाबदारी येऊन ठेपली आहे.