राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश निश्चित? याकडे सर्वांचे लक्ष!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रवेशाची चर्चा सध्या जिल्ह्यात जोरदार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये याविषयी सातत्याने बातम्या येत आहेत, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
राहुल पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा यासाठी करवीर, पन्हाळा आणि राधानगरी येथील कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली आहेत. या बैठकांमध्ये दोन मुख्य मतप्रवाह समोर आले आहेत. एका गटाने असे मत मांडले आहे की, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि आपला गट टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश करणे आवश्यक आहे. याशिवाय, भोगावती सहकारी साखर कारखान्याला शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आणि कारखाना वाचवण्यासाठीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणे अपरिहार्य असल्याचे या गटाचे म्हणणे आहे.
याउलट, काही कार्यकर्त्यांनी मात्र काँग्रेसशी एकनिष्ठ राहण्याचा मुद्दा लावून राहुल पाटील यांनी काँग्रेस सोडू नये, अशी भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे गटनेते आणि आमदार सतेज पाटील यांनीही राहुल पाटील यांना काँग्रेसमध्येच राहण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे.
तरीही, राहुल पाटील यांनी राष्ट्रवादीतच प्रवेश करावा यासाठी जिल्ह्यातील काही ज्येष्ठ नेत्यांची एक विशेष यंत्रणा सक्रिय झाली आहे. हे नेते राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्यावर दबाव आणत असल्याचे बोलले जात आहे. या घडामोडी पाहता, नजीकच्या काळात राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे.