नामदार गोपाळ कृष्ण गोखले शाळेत ‘लोकशाहीचा उत्सव’: ई-बॅलेटद्वारे विद्यार्थ्यांचे मतदान!

कागल (सलीम शेख ) : कागल येथील नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्या मंदिर येथे नुकतीच मंत्रिमंडळ निवडणूक अत्यंत उत्साहात पार पडली. या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत, प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसारख्या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित मतदान प्रक्रियेचा अनुभव घेतला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक झाली.
या निवडणुकीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ईव्हीएम मोबाईल व्होटिंग मशीन आधारित घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याची सखोल माहिती घेतली. निवडणुकीसाठी प्रत्येक वर्गाला आरक्षण जाहीर करण्यात आले होते. उमेदवारांनी स्वहस्ताक्षरात उमेदवारी अर्ज भरले. त्यानंतर उमेदवारी अर्जांची छाननी, पात्र-अपात्र उमेदवारांची घोषणा आणि माघार प्रक्रिया पार पडली. लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रचार यंत्रणा राबवण्यासही प्रोत्साहन देण्यात आले.
या संपूर्ण प्रक्रियेत अर्ज भरण्यापासून ते मतदानापर्यंतचे सर्व टप्पे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले. उमेदवारांनी अर्ज भरणे, त्यांची छाननी करणे, पात्र-अपात्र उमेदवार ठरवणे, उमेदवारांची अंतिम यादी घोषित करणे, प्रचारासाठी वेळ देणे, मतपत्रिका आणि मतदार यादी तयार करणे, ईव्हीएम मशीन सेटिंग करून मोबाईल मतदान मशीनच्या साह्याने मतदान प्रक्रिया राबवणे या सर्व बाबींचा यात समावेश होता. यासाठी विशेष ईव्हीएम मोबाईल ॲपचा वापर करण्यात आला.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संतोष पाटील सर व सचिन गाडेकर सर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच, शाळेतील इतर सर्व शिक्षक व कर्मचारी, ज्यात शकील तासीलदार यांचाही समावेश होता, त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. शाळेचे मुख्याध्यापक सागर नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक यशस्वी झाली. हा नाविन्यपूर्ण प्रयोग विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढवणारा ठरला.
ईव्हीएम आधारित निवडणुकीचा निकाल सीलबंद ठेवण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी, मतमोजणी प्रक्रिया कशी राबवली जाते, हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवून निकाल जाहीर करण्यात आला. प्रत्यक्ष झालेले मतदान, प्रत्येक उमेदवाराला पडलेली मते आणि त्यांची बेरीज यांसारख्या सर्व बाबी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या. या प्रक्रियेत उमेदवार म्हणून भाग घेतलेल्या आणि निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे गुलाल लावून सत्कार करण्यात आला. त्यानंतर शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर सर्व मंत्र्यांची स्थापना करण्यात आली.