धक्कादायक: दारिद्र्याच्या वादातून मुलानेच घेतला वडिलांचा जीव, सांगली हादरले!

सांगली, (प्रतिनिधी): “आमच्यासाठी काय कमावून ठेवलंस? आम्हाला कायम दारिद्र्यातच ठेवलं आहेस!” या शब्दांतून पेटलेल्या कौटुंबिक वादाने तासगावात एका मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशांच्या वादामुळे मुलाने केलेल्या अमानुष मारहाणीत ६५ वर्षीय वडिलांचा मृत्यू झाल्याने तासगावातील कांबळेवाडी हादरली आहे. या प्रकरणी तासगाव पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांबळेवाडी येथील सुधाकर तुकाराम कांबळे (वय-६५) यांचा मुलगा सचिन सुधाकर कांबळे (वय-४५) याने किरकोळ कारणावरून त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी भीषण होती की त्यात सुधाकर कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मयत सुधाकर कांबळे हे पत्नी सुनिता अशोक कांबळे आणि मुलगा सचिन यांच्यासोबत कांबळेवाडीत राहत होते. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. याच गरिबीवरून मुलगा सचिन नेहमी वडिलांशी वाद घालायचा. रविवार, २७ जुलै रोजीही सचिनने याच कारणावरून आपल्या ६५ वर्षीय वडिलांना दिवसभर लाथा-बुक्क्यांनी, गाल, कान आणि शरीरावर अनेक ठिकाणी ठोसे मारत मारहाण केली.
सोमवारी (२८ जुलै) सकाळी सुधाकर कांबळे यांच्या पत्नी त्यांना उठवण्यासाठी गेल्या असता, सुधाकर निपचित पडलेले दिसले. त्यांनी तातडीने शेजाऱ्यांना मदतीसाठी हाका मारल्या. सकाळी सुधाकर कांबळे यांचे मेहुणे कुमार मल्लाप्पा मागडे यांनी ‘११२’ या पोलीस मदत क्रमांकावर फोन करून सुधाकर कांबळे यांचा गळा दाबून खून झाल्याची माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच, तासगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. घटनास्थळावरील प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित सचिन कांबळे याला ताब्यात घेतले. मृत सुधाकर कांबळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून सचिन कांबळेने केलेल्या मारहाणीमुळेच वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर, तासगाव पोलिसांनी संशयित सचिन सुधाकर कांबळे यास खुनाच्या आरोपाखाली ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारी विमला एस, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे, पोलीस अंमलदार अभिजीत गायकवाड, सागर पाटील, प्रशांत चव्हाण, सतीश साठे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेने तासगावात हळहळ व्यक्त होत असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या भीषण घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.