कणेरी पाझर तलावाची गळती कधी थांबणार? ग्रामस्थांचा सवाल; लाखो लिटर पाण्याची नासाडी!
कणेरी (सलीम शेख ) : करवीर तालुक्यातील कणेरी येथील पाझर तलावाला मुख्य दरवाजातून मोठ्या प्रमाणात गळती लागली असून, यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाटबंधारे विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
१९७२ च्या दरम्यान बांधलेला हा तलाव नेर्ली, कणेरी, कणेरीवाडी आणि गोकुळ शिरगाव येथील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या गळतीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या तलावाच्या पाण्यावर सुमारे १५० ते २०० एकर क्षेत्रावर उन्हाळी ऊस पिकवला जातो. तसेच, कणेरी, कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव येथील शेतकरी आपली जनावरे धुण्यासाठीही या तलावाचा वापर करतात.
याशिवाय, कणेरी आणि गोकुळ शिरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत विकसित झाल्याने अनेक उपनगरे तयार झाली आहेत. या उपनगरातील रहिवाशांसाठीही हा तलाव महत्त्वाचा आहे. त्यामुळे, ही गळती वेळीच थांबवली नाही तर भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांचा संताप
ग्रामस्थांनी अनेकदा पाटबंधारे विभागाला पत्रव्यवहार करून आणि फोनद्वारे संपर्क साधून या गळतीकडे लक्ष वेधले आहे, परंतु त्यांच्याकडून ‘उडवाउडवीची उत्तरे’ मिळत असल्याचा आरोप शेतकरी कृष्णात सूर्याजी शेळके यांनी केला आहे. तीन ते चार गावांना या तलावाचा उपयोग होत असल्याने यावर तातडीने लक्ष देण्याची गरज ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
ग्रामपंचायत सदस्यांकडून आश्वासनाची प्रतिक्षा
या संदर्भात कणेरीवाडीचे ग्रामपंचायत सदस्य अरुण मोरे यांनी सांगितले की, “तलावाच्या गळती संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, लवकरच याचे काम पूर्ण होईल असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून मिळाले आहे. त्यामुळे ही गळती रोखली जाईल असा विश्वास आहे.”
सध्या तरी ग्रामस्थ आणि शेतकरी या गळतीमुळे चिंतेत असून, पाटबंधारे विभागाने तातडीने लक्ष देऊन पाण्याची ही नासाडी थांबवावी अशी मागणी करत आहेत.