खाऊचे पैसे वाचवून जवानांना १००१ राख्या पाठवल्या!!

कोल्हापूर (सलीम शेख) : कोल्हापुरातील चिमुकली सिद्धावी सोनल शैलेश साळोखे हिने एक कौतुकास्पद उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. तिने वर्षभर खाऊसाठी मिळालेले पैसे वाचवून त्यातून तब्बल १००१ राख्या खरेदी केल्या आणि आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्या सीमेवरील जवानांसाठी सुपूर्द केल्या.
स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या ‘सीमेवरील जवानांसाठी एक राखी’ या अभिनव उपक्रमासाठी सिद्धावीने हे योगदान दिले आहे. तिच्या या कृतीमुळे बालवयातच समाजकार्याची आवड जोपासल्याचे दिसून येते आणि सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.
या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष किशोर घाटगे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कृष्णा लोंढे, सिद्धावीचे वडील शैलेश साळोखे, आई सोनल साळोखे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. तसेच शाहू स्मारक भवनचे व्यवस्थापक दत्तात्रय नांगरे आणि संदीप कांबळे यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली.