महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा ६३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा: कोल्हापूर औद्योगिक प्रगतीत ‘मॉडेल’ ठरेल!

कोल्हापूर (सलीम शेख) : छत्रपती शाहू महाराजांनी औद्योगिक विकासाचा पाया रचल्यामुळे कोल्हापूर जिल्हा आज औद्योगिक प्रगतीत एका ‘मॉडेल’ जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी एमआयडीसीच्या योगदानाचा गौरव करत जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीचे कौतुक केले.जिल्हाधिकारी येडगे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमुळे येथील निर्यात औद्योगिक समृद्धीचे प्रतीक बनली आहे. येथील औद्योगिक आणि खाजगी आस्थापना गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्नशील आहेत. औद्योगिक वाढीसोबतच पर्यावरण रक्षण हेही समान महत्त्वाचे आहे, असे सांगत त्यांनी पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी उद्योजकांनी दिलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख केला.
एमआयडीसीच्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत महारक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे रक्त संकलन सीपीआर हॉस्पिटलद्वारे तर आरोग्य तपासणी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलद्वारे करण्यात आली. या सामाजिक उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.
उल्लेखनीय सेवा आणि सन्मान
यावेळी एमआयडीसीचे उपअभियंता अजयकुमार गणपती रानगे आणि बाळासाहेब आनंदा चौगुले यांना त्यांच्या २५ वर्षांच्या समर्पित सेवेबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते चांदीचे नाणे देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थी आणि खेळाडूंचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक होते, तर प्रास्ताविक प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख यांनी केले. याप्रसंगी विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेश देशमुख यांनी ‘एक खिडकी’ योजना राबविण्यात कोल्हापूर विभाग राज्यात अग्रस्थानी असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राचे अजयकुमार पाटील, गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, के.आय.ए.चे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, फाउंड्री क्लस्टरचे अध्यक्ष दीपक चोरगे आणि सीआयआयचे सारंग जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.