मृत समजलेली पत्नी जिवंत परतल्याने उदगावमध्ये खळबळ!

उदगाव (सलीम शेख) : उदगाव गावात एक अत्यंत धक्कादायक आणि गूढ घटना समोर आली आहे. आपल्या पत्नीचे निधन झाल्याचे समजून तिच्यावर अंत्यसंस्कार केले, मात्र तीच पत्नी दुसऱ्याच दिवशी जिवंत घरी परतल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
उदगाव येथील संजना महेश ठाणेकर (वय ३७) या १९ जुलै रोजी घरातून निघून गेल्या होत्या. त्यांनी माहेरी आई आजारी असल्याचे कारण दिले होते. मात्र, त्या माहेरी पोहोचल्या नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांचे पती महेश ठाणेकर यांनी जयसिंगपूर पोलिसांत संजना हरवल्याची तक्रार दाखल केली.
दुसऱ्याच महिलेवर झाले अंत्यसंस्कार
दरम्यान, २९ जुलै रोजी मिरज तालुक्यातील निलजी बामणी येथील कृष्णा नदीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेह ओळखण्यासारख्या स्थितीत नसल्यामुळे कपडे, गळ्यातील दागिने आणि गालावरील तीळ यावरून तो संजना यांचाच असल्याचा समज झाला. यामुळे उदगाव येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि रक्षाविसर्जनही झाले.
पत्नी परत आल्याने गुंता वाढला
संजना मृत झाल्याचे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर ३० जुलै रोजी त्या अचानक गावात परत आल्या. एका बचत गटाचे पैसे देण्यासाठी त्या आल्याचे समजते. ही माहिती मिळताच ३१ जुलै रोजी पोलिसांनी संजनाला पोलीस ठाण्यात बोलावले. त्यांनी या काळात तासगाव आणि बारामती येथे गेल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर त्या पुन्हा कुठे निघून गेल्या याची माहिती उपलब्ध नाही.
महेश ठाणेकर यांनी, कोणताही वाद किंवा घटस्फोटाचे प्रकरण नसतानाही आपली पत्नी आपल्याला भेटू दिली नाही, अशी तक्रार केली आहे. त्यांनी संजनाला पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावून घेण्याची मागणी केली आहे.
या घटनेमुळे ज्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले, ती अज्ञात महिला कोण आणि तिचा मृत्यू कसा झाला, याबाबत मिरज आणि जयसिंगपूर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या घटनेने संपूर्ण गावात एकच चर्चा सुरू आहे