पुण्यात पीडितेला मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण, वंचित बहुजन आघाडीकडून पोलिसांवर कारवाईची मागणी

पुणे: (कोल्हापूर टाइम्स न्यूज नेटवर्क): पीडितेला मदत करण्यासाठी गेलेल्या तीन सामाजिक कार्यकर्त्या तरुणींना पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ, अश्लील भाषेचा वापर करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला नाही, असा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने दोषी पोलिसांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
ॲट्रॉसिटी कायद्याच्या कलम १८ (अ) नुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवणे बंधनकारक असतानाही, तो दाखल न केल्याने संबंधित पोलिसांवरच ॲट्रॉसिटी कायद्याच्या कलम ४ नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
या घटनेमुळे पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनाच पोलिसांकडून अशा प्रकारे वागणूक मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पोलीस आयुक्तांना निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव प्रियदर्शी तेलंग, राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे, राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव, शहर अध्यक्ष अरविंद तायडे, सागर आल्हाट, तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.