गांधीनगर पोलिस ठाण्याची गणेशोत्सव मंडळांची बैठक संपन्न!

गांधीनगर (सलीम शेख) : महाराष्ट्राचा प्रमुख सण असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, उचगाव, मणेरमाळ आणि गांधीनगर परिसरातील गणेशोत्सव मंडळांची एक महत्त्वपूर्ण बैठक गांधीनगर पोलीस ठाण्याने आयोजित करण्यात आली होती. गणेशोत्सव शांतता आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने विविध सूचना व मार्गदर्शन केले.
या बैठकीला भागातील अनेक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी मंडळांना मंडप उभारणी, डॉल्बीचा वापर आणि इतर नियमांचे पालन करण्याबद्दल सविस्तर माहिती दिली. उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वांनी नियमांनुसार वागावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सर्व गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून, हा उत्सव शांततापूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन गांधीनगर पोलिसांकडून करण्यात आले. या बैठकीमुळे गणेशोत्सव मंडळांना उत्सवाचे नियम आणि कायदे समजून घेण्यास मदत झाली असून, यंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पडेल.