सरपिराजीराव तलाव सांडव्यावर उड्डाणपूल व्हावा – शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

मुरगूड (सलीम शेख) : मुरगूड ते गडहिंग्लज राज्यमार्गावरील सरपिराजीराव तलावाच्या सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे अपघातांची संख्या वाढत असून, या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची मागणी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रा. सुनिल शिंत्रे (जिल्हाप्रमुख, शिवसेना) आणि सुरेश चौगुले (उपजिल्हाप्रमुख ) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पावसाळ्यानंतरही चार ते पाच महिने तलावाच्या सांडव्यातून वाहणारे पाणी रस्त्यावरून वाहते. यामुळे वाहतुकीस धोका निर्माण होतो आणि अपघातांचे प्रमाण वाढते. काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावर शेवाळ तयार होऊन पादचारी व दुचाकीस्वार घसरून गंभीर जखमी होत आहेत.
शिवसेनेने या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने योग्य कार्यवाही करावी, अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे. तसेच संबंधित कामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली लवकरात लवकर बैठक घेण्यात यावी, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत तहसिलदार कागल व राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुख्य अभियंत्यांना देण्यात आली आहे.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे यांनीही या मागणीला पाठिंबा दर्शवला असून, जनतेच्या सुरक्षेसाठी हा पूल अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.