तळंदगेत ऊसाच्या शेतात अर्भकाचा मृतदेह सापडला; परिसरात खळबळ

तळंदगे (सलीम शेख) : तळंदगे गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावातील धोंडीबा नानासो फडतारे यांच्या ऊसाच्या शेतात अंदाजे तीन महिन्यांच्या अर्भकाचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी सकाळी ९ वाजता शेतात गेलेल्या फडतारे यांना माती उकरलेली दिसली. संशय आल्याने त्यांनी मुलगा विनोद फडतारे याला माहिती दिली. त्यानंतर पोलिस पाटील समीर मुल्लानी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. हुपरी पोलिसांना माहिती मिळताच अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी खोदकाम करताच मृत अर्भक सापडले. घटनास्थळी हँडग्लोव्हज, मीठ, रक्त लागलेल्या पिशव्या आणि इतर संशयास्पद वस्तूही आढळल्या, ज्यामुळे प्रकरण गंभीर असल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेची माहिती मिळताच इचलकरंजी विभागाचे डीवायएसपी विक्रांत गायकवाड, अप्पर तहसीलदार महेश खिलारे आणि पोलीस निरीक्षक एन.आर. चौखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. फॉरेन्सिक पथकाला तपासासाठी पाचारण करण्यात आले आहे.
घटनास्थळाजवळील औद्योगिक वसाहतीत अनेक परप्रांतीय कुटुंबे वास्तव्यास असल्यामुळे आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. अर्भकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास एपीआय विकास शिंदे करत आहेत.